Maratha Reservation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडला जातो आहे. आज (6 जून) शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. या सहळ्यानिमित्त रायगडावरुन बोलताना संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा छेडला. दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) यांनीही सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक साजरा केला. त्यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) प्रवक्ते खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनीही संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन सवाल उपस्थित केला आहे. पाहा, मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे आणि शिवसेना खासदार अरविंद काय म्हणाले.

आतापर्यंत संयम पाहिला.. आता गप्प राहणार नाही- संभाजीराजे छत्रपती

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले की, आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिलात. आता यापुढे आपण गप्प बसणार नाही. जगेन तर समाजासाठीच. आम्ही आता ठरवलं आहे की आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन निश्चीत आहे. येत्या 16 जून रोजी मोर्चा काढण्याचा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात येत्या 16 जून पासून संभाजी राजे यांच्याकडून आंदोलन करण्याचा इशारा)

राज्य सरकारने आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी- उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या नेतृत्वाचा मुद्दा नाही. खासदार संभाजी छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. त्यामुळे आमच्यात विसंगती असण्याचे कारण नाही. राज्य सरकारने आगोदर आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर आम्ही आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचे ते ठरवू. समजाचा उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी ही राजकीय नेत्यांवरच राहिल असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

आंदोलन कोणाच्या विरोधात? अरविंद सावंत यांचा सवाल

संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले रायगडावरुन जाहीर केले की येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चा काढला जाईल. परंतू, हे आंदोलन कोणाच्या विरोधात आहे? छत्रपती संभाजीराजे हे भाजप खासदार आहेत. त्यामुळे आपण कोणाविरुद्ध लढतो आहोत? कशासाठी लढतो आहोत हे त्यांनी ठरवावे. न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यांचा मोर्चा न्यायालयाच्या विरोधात आहे का? असा सवालही अरविंद सावंत यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. पण तुम्हाला कोणी काढा दिल्याने तुमचा आवाज वाढला आहे का? असा चिमटाही अरविंद सावंत यांनी काढला आहे.