Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात येत्या 16 जून पासून संभाजी राजे यांच्याकडून आंदोलन करण्याचा इशारा
Sambhaji Raje (Photo Credits: Facebook)

Maratha Reservation:  सर्वोच्च न्यायालयाने 5 जून रोजी सुनावणी करत मराठा आरक्षण रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला. त्याचसोबत विरोधकांकडून सुद्धा राज्य सरकारवर या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली. याच पार्श्वभुमीवर खासदार संभाजी राजे यांनी 6 जून पर्यंत राज्य सरकारला मराठा समाजाबद्दल भुमिका घेण्यासाठी वेळ दिला होता. तर आजच्या शिवराज्याभिषेक दिनावेळी संभाजी राजे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले की, आजपर्यंत सहन केले पण आता गप्प बसणार नाही. त्यामुळे जे होईल ते होईल असे म्हणत मराठा समाजाच्या हक्कासाठी येत्या 16 जून पासून आंदोलन करण्याचा इशारा संभाजी राजे यांनी दिला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर संभाजीराजे यांनी मराठा समाजाबद्दल भुमिका मांडली. त्यावेळीच त्यांनी आजवर गप्प बसलो, परंतु आता येत्या 16 जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीच्या येथून मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सुरुवात करु असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार मराठा समाजाच्या मुद्द्यावर नेमकी कोणती भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(10% EWS Reservation To Maratha Students: मराठा समाजातील विद्यार्थी, उमेदवारांना 10 टक्के  EWS आरक्षण लाभ देण्याचा सरकारचा निर्णय)

दरम्यान, संभाजी राजे यांनी राज्यभर दौरा करण्यासह विविध नेत्यांची सुद्धा काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. तेव्हा संभाजी राजे यांनी राज्य सरकारकडे पाच प्रमुख मागण्या केल्या होत्या. ऐवढेच नव्हे तर गरज भासल्यास नवा पक्ष स्थापन करु असे सुद्धा म्हटले होते.

तर मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर तो निकाल आपल्या बाजूने कसा आणता येईल यासाठी काय करावे आणि चर्चा-विनियम करुन मार्ग काढता येईल असे संभाजी राजे यांना वाटत होते. मात्र या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार वेळा वेळ सुद्धा मागितली पण त्यांनी ती दिली नाही. अखेर संभाजी राजे यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.