मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उद्या (16 जून 2021) कोल्हापूर (Kolhapur) येथून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनात अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. यातच वंचित बहुजन विकास आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणातली ही मोठी घडामोडी ठरणार आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता संभाजीराजे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर वंचित आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की, 'उद्या दि. 16 जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत' हे देखील वाचा-Governor Nominated MLC Maharashtra: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची 'ती' यादी राजभवनाकडेच; माहिती अधिकारात खुलासा; मुंबई हायकोर्टात याचिका
वंचित बहुजन आघाडीचे ट्वीट-
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.@Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 15, 2021
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केले होते. पण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. त्याचबरोबर करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करुन हे आंदोलन करण्यात यावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हेही सहभागी होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.