Representational Image (Photo Credits: ANI)

काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ (अँटीलिया) एक स्फोटकांनी भरलेली संशयास्पद कार आढळली होती. या घटनेनंतर अंबानी यांच्या घराबाहेरील सुरक्षा अजूनच वाढवली होती. आता माहिती मिळत आहे की, या कारचा मालक मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार मालक मनसुख (Mansukh Hiren) यांनी कळवा पुलावरून उडी मारून आपला जीव दिला आहे. ठाण्याचे डीसीपी यांनी सांगितले की, मुकेश अंबानींच्या घराबाहेर ज्यांची गाडी सापडली होती, त्या मनसुख हिरेनने आत्महत्या केली आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हिरेन मनसुख काल रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दुपारी ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात ते हरवले असल्याची तक्रार नोंदवली होती. आज त्यांचा मृतदेह मुब्राच्या रेतीबंदर खाडीत सापडला. मनसुख हिरेन हे ठाण्यात कार डेकोरचा व्यवसाय करत होते. यासह ते सामाजिक कार्यात भाग घेत होते. त्यांची पत्नी विमला हिरेनसुद्धा सामाजिक कार्यात सहभागी होत्या.  या कारचा मूळ मालक सॅम मुटेन नावाची व्यक्ती आहे. त्याने गाडीच्या इंटीरियरची देखभाल करण्यासाठी मनसुख हिरेन यांना कार दिली होती. सॅमने पैसे न दिल्याने हिरेनने कार आपल्याच ताब्यात ठेवली होती.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या बातमीवर म्हटले की, ‘हिरेन हे संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा होते. त्यांना तातडीने संरक्षण देण्यात यावे अशी मी मागणी केली होती. ही संपूर्ण बाब संधीग्द वाटत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एनआयएकडे देण्यात यावी, अशी मागणी काही काळापूर्वी विधानसभेतही केली आहे.’ (हेही वाचा: Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप, तपास NIA कडे देण्याची मागणी)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख अंबानी यांचे बहु-मजली ​​घर, 'अँटिलिया' जवळ 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एसयूव्हीमध्ये (स्कार्पिओ) अडीच किलो जिलेटिन स्टिक्स (स्फोटक सामग्री) जप्त करण्यात आली. एसयुव्हीच्या आत एक पत्रही होते, ज्यामध्ये अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली होती. पोलिस तपासणीनंतर मनसुख हिरेन यांनी आपली गाडी चोरी झाल्याचे सांगितले होते आणि त्यासाठी त्यांनी एफआयआरही दाखल केला होता. आता याच मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली आहे.