Manoj Jarange-Patil Withdraws His Hunger Strike

Manoj Jarange-Patil Broke His Fast: कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी सोमवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू केलेले 17 दिवसांचे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगरमध्ये उपचार घेणार आहेत. मात्र जोपर्यंत महाराष्ट्र सरकार कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्या लोकांच्या इतर कुटुंबीयांनाही जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करत नाही तोपर्यंत ते आपले आंदोलन सुरूच ठेवतील, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाच्या मागण्यांसाठी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा हा निर्णय घेतला.

मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के वेगळे आरक्षण देणारे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी गेल्या आठवड्यात एकमताने मंजूर केले. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसलेले जरंगे यांनी मात्र ओबीसी प्रवर्गात मराठा आरक्षणासाठी आग्रह धरला आणि आपले उपोषण सुरूच ठेवले. आता 17 दिवसांनी त्यांनी हे उपोषण सोडले. समाजाची मागणी आहे त्यामुळे मी उपोषण सोडतोय असे त्यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले, 'मी आज माझे आंदोलन (उपोषण) स्थगित करत असलो तरी आमच्या मागण्यांसाठी दररोज 3 ते 4 तरुण येथे बसून उपोषण करणार आहेत. मी काही गावांना भेटी देऊन लोकांना माझी भूमिका समजावून सांगेन. गृहखात्याने घातलेल्या निर्बंधांमुळे लोक मला इथे (अंतरवली सराटी गावात) भेटायला येऊ शकले नाहीत, त्यामुळे मीच त्यांच्याकडे जाणार आहे.'

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलन उग्र झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मनोज जरांगे पाटील याच्यावर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवरही कारवाई केली जात आहे. विनापरवानगी आंदोलन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. सोमवारी पहिल्यांदाच थेट मनोज जरांगे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. कालपासून राज्य सरकारने सुमारे 1041 गुन्हे नोंदवले आहेत. त्यापैकी मराठवाड्यात 425 गुन्हे दाखल झाले आहेत. (हेही वाचा: Maratha Quota Agitation: मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, संचारबंदी लागू)

दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत मनोज जरांगे म्हणाले, 'जर त्यांना माझ्यावर खटला चालवायचा असेल तर मला काही अडचण नाही, पण (असे केल्याने) ते अडचणीला आमंत्रण देतील. लोक संतप्त होतील आणि मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.'