मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आजवर या समाजावर प्रचंड अन्याय झाला आहे. आमची मागणी प्रामाणिक आहे. त्यामुळे आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही. खरे तर सरकारच्याच मनात आरक्षण द्यावे अशी भावना दिसत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, मराठा समाजाला त्रास देणाऱ्या एकालाही येणाऱ्या निवडणुकीत निवडून देऊ नका. असा लोकांची अजिबात गय करु नका, असे थेट अवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीड येथील जाहीर सभेतून केले आहे. त्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारलाही थेट इशारा दिला आहे.
कोणाला पाडायचे कोणाला निवडून द्यायचे?
लोकसभा निवडणुकीत मराठ्यांनी जोरदार कार्यक्रम केला. पण, काही ठिकाणी लोकांना नेमके काय करायचे हे समजले नाही. त्यामुळे काही ठिकाणी नको त्याला निवडून दिले. या वेळी लक्षात ठेवा या निवडणुकीत मराठा समाजातील जवळपास 10 हजार मतदारांनी मतदानच केले नाही. तर जवळपास 20 हजार लोकांनी चुकीच्या माणसाला मत केले. असे जवळपास 30 हजार मतदान वेगळ्या मार्गाने गेले. नाहीतर हे लिड तुटले नसते, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या वेळी आपण कोणाला पाडायचे हे नाव घेऊन सांगणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. (हेही वाचा, Manoj Jarange Patil: फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंची बीडमध्ये रॅली)
धनगर समाजास विरोध नाही
मनोज जरांगे पाटील आमचा कोणत्याही समाजाला किंवा त्यांच्या आरक्षणाला आजिबात विरोध नाही. धनगर समाजाला तर मुळीच नाही. कारण मराठा समाजाने ओबीसी आरक्षण मिळवले तरी त्यांच्या आरक्षणाला कोणताच धक्का लागत नाही. असे असले तरी सुद्धा अनेक लोक उगाचच छगन भुजबळ यांच्या नादी लागून मराठा आरक्षण आमच्या समाजाला मिळू नये म्हणून विरोध करत आहेत. छगन भुजबळ हेच सर्वांमध्ये कळ लावत आहे. दंगली व्हाव्यात याच त्यांच्या भावना आहेत. ते राज्य सरकारच्याही बाजूने आहेत आणि मराठा आरक्षणाच्या विरोधातही आहेत. आपण फक्त भुजबळ यांनाच विरोधक मानतो. बाकीच्यांना गिणतच नाही. कारण, इतरांनी कितीही विरोध केला तर फरक पडत नाही. कारण त्यांना भुजबळांनीच उठवून उभे केले आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनीही भुजबळ यांना उगाचच जवळ केले आहे असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Laxman Hake Jalna Hunger Strike: लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय)
श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांच्या मदतीला येणार नाही
सर्व मराठ्यांना माझी विनंती आहे. गरीब श्रीमंत ही दरी कमी करा. कोणत्याही मराठ्याने स्वत:ला गरीब समजू नये. लक्षात ठेवा, गरीब मराठाच गरीब मराठ्यांच्या मदतीला येणार आहे. श्रीमंत मराठा कधीही गरीब मराठ्यांच्या मदतीला येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा आपणच आपली मदत करायची आहे.