मांजर (Cat) समजून एका व्यक्तीने नाशिकमध्ये चक्क बिबट्याचं (Leopard) पिल्लू पाळलं होतं. त्याला रोज दूध, पोळी, ब्रेड अशा गोष्टी मालक खायला देऊ लागला. पण यामुळे बिबट्याच्या पिल्ल्याच्या प्रकृतीवर विपरित परिणाम झाले आणि ते मरणासन्न अवस्थेमध्ये पोहचले. पिल्लाची अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. नाशिक वन विभागाकडे हे पिल्लू आल्यानंतर त्यांच्याकडून पुण्यामधील रेसक्यू फाऊंडेशन कडे त्याला सोपवलं. त्यांनी महिन्याभरातच या पिल्लावर उपचार केले. आता पाच महिन्यांच्या उपचारांनंतर हे पिल्लू ठणठणीत झालेलं असल्याची माहिती देण्यात आली.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, बिबट्याच्या पिल्ल्याचं नाव 'चुटकी' आहे. तिला वाचवण्यासाठी 'बुटकी' या बिबट्याच्या अन्य पिल्लाकडून कडून रक्तदान करण्यात आले. सुदैवाने त्यांचा रक्तगट जुळला आणि त्याचा सकारात्मक परिणाम चुटकीच्या आरोग्यावर झाला आहे. आता पिंजर्यामध्ये चुटकी दंगामस्ती करताना दिसते. नक्की वाचा: Leopard Attack In Aarey Colney: 38 वर्षीय महिलेवर आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत .
'चुटकी’रेसक्यू फाऊंडेशन मध्ये दाखल झाली तेव्हा तिच्या त्वचेला गंभीर संसर्ग झाला होता. केस गळाले होते. हिमोग्लोबिन कमी होते. अशक्तपणामुळे चालणं शक्य नव्हतं. पण रक्तदान आणि अन्य औषधांमुळे प्रकृतीमध्ये मोठा बदल झाला. बिबट्यांमधील रक्तदानाचा प्रयोग यशस्वी झाल्याची आपल्याकडे यापूर्वी कधीही नोंद नाही. पण या रेसक्यू फाऊंडेशन मध्ये प्रयोग यशस्वी झाला आहे. ही माहिती बाहेर प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरातील इतर वन्यजीव उपचार केंद्रांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.