ऐन दिवाळीच्या दिवशी दीड वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची (Leopard Attack) बातमी ताजी असताना आता आरे कॉलनीमध्ये (Aarey Colney) अजून एक घटना समोर आली आहे. एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या स्त्रीला सध्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या सकाळी युनिट नंबर 15 मध्ये आईसोबत दिवा लावण्यासाठी बाहेर आलेल्या दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. नंतर रात्री देखील अन्य एका व्यक्तीवर हल्ला झाला होता. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. वनविभागाने लोकांच्या मागणीनुसार पिंजरे लावून त्याला जेरबंद केले. आता या विभागात अजून एक बिबट्या फिरत असल्याने वन विभाग त्याचा शोध घेत आहे.
आरे कॉलनी परिसरामध्ये आदर्श नगर परिसरामध्ये संगीता गुरव या 38 वर्षीय महिला (11 नोव्हेंबर) काल आपल्या घरी जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्या थोडक्यात बचावल्या. पण त्यांच्या डोक्याला, मानेला दुखापत झाली आहे. सध्या त्यांना ट्रॉमा केअर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.