गोरेगाव (Goregaon) मध्ये आरे कॉलनी (Aarey Colony) भागात आज (24 ऑक्टोबर) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इतिका लोट असं मृत चिमुरडीचं नाव आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आरे कॉलनी परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचं यापूर्वीच निदर्शनास आलं आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास यंत्रणा देखील सज्ज आहे पण अशा स्थितीतही आज सकाळी साडे सहाच्या सुमारास दुग्ध वसाहत युनिट नंबर 15 मध्ये राहत असलेल्या अखिलेश लोट यांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला आहे. दिवे लावण्यासाठी बाहेर पडलेल्या या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला.
इतिका दिसत नसल्याने तिची घराच्या जवळ आणि जंगल परिसरात शोधाशोध सुरू झाली. तेव्हा 100 मीटर अंतरावर जखमी अवस्थेमध्ये इतिका दिसली. तातडीने तिला सेव्हन हिल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतू तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता. हे देखील वाचा: Leopard in Badlapur: बदलापूर येथे दुसरा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण .
गेल्या काही वर्षात आरे कॉलनीमध्ये मानवी हस्तक्षेप वाढला असून बांधकाम, अतिक्रमण वाढल्याने जंगलाचा भाग कमी झाल्याने हे असे प्रकार सातत्याने समोर येत असल्याचा दावा केला जातो.