Makar Sankranti Kite-Flying Safety Advisory: यंदा म्हणजेच 2025 मध्ये मंगळवार दिनांक 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2025) सण साजरा होणार आहे. धार्मिक विधींसोबतच या दिवशी पतंग उडवून (Kite-Flying) हा उत्सव साजरा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पतंग आणि तो उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मकरसंक्रांत जवळ येत असताना, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने एक महत्त्वाचा सुरक्षा मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यामध्ये लोकांना सणासुदीच्या काळात पतंग उडवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
एका महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आकाशात उंच उडणारे पतंग, मुले आणि प्रौढ दोघांनाही आनंद देतात. मात्र, पतंग उडवण्याशी संबंधित संभाव्य धोके आहेत, विशेषत: जेव्हा पतंग किंवा मांजा विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विजेच्या तारांच्या संपर्कात येतो.’
पतंग उडवताना सुरक्षा मार्गदर्शक तत्वे-
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी असे निदर्शनास आणून दिले की, मकर संक्रांतीच्या वेळी जेव्हा मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात, तेव्हा शहरी आणि ग्रामीण भागात असलेले वीज पायाभूत सुविधांचे व्यापक जाळे अपघातांची शक्यता वाढवते. कंपनीने लोकांना पतंग उडवताना इलेक्ट्रिकल उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे, पॉवर लाईन किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ पतंग उडवणे टाळण्यास सांगितले आहे.
अपघाताचा धोका कमी करण्यासाठी, महावितरणने विजेच्या तारांपासून दूर मोकळ्या मैदानात पतंग उडवण्याची शिफारस केली आहे. लोकांनी विजेच्या खांबावर किंवा तारांवर अडकलेले पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करणे देखील टाळावे, कारण यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते, ज्यामुळे दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. (हेही वाचा: Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळाच्या निम्मीत्ताने प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई, खास लेसर शोचे आयोजन)
नागरिकांना आवाहन-
पॉवर लाईनमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी छतावर किंवा ट्रान्सफॉर्मरवर चढण्यापासून सावधगिरी बाळगण्याबाबतही सूचना देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, लोकांना आवाहन केले जाते की, त्यांनी विजेच्या तारांवर अडकलेले पतंग काढण्यासाठी दोरीने बांधलेले दगड फेकू नका. दुसरी महत्त्वाची सुरक्षितता टीप म्हणजे मेटल-लेपित पतंगाच्या मांजाचा वापर टाळणे, कारण ते वीज प्रवाहित करू शकतात आणि पॉवर सिस्टमच्या संपर्कात आल्यावर विद्युत शॉकचा धोका वाढवू शकतात.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत, महावितरणने वीज पुरवठा खंडित होणे आणि त्वरित मदत सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधण्याची शिफारस केली आहे. पुढील समर्थनासाठी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी टोल-फ्री क्रमांक 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 वर संपर्क साधला जाऊ शकतो.