Nawab Malik Mocked Nitesh Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनादरम्यान (Maharashtra Winter Session 2021) विधिमंडळाच्या पायऱ्यांवरुन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पाहून 'म्यॅव म्यॅव' असा आवाज काढला. त्यानंतर नितेश राणे यांच्यावर टीका होऊ लागली. दरम्यान, या सर्व प्रकारावरुन अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही नामोल्लेख टाळत निशाणा साधला आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मॉर्फ केलेला असून त्यात कोंबडा आणि मांजर यांचे मिश्रण करण्यात आले आहे. तसेच, या फोटोला 'पेहचान कौन?' अशी प्रश्नचिन्हात्मक कॅप्शनही दिली आहे. मलिक यांच्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन या वेळी काहीसे वाद प्रतिवादांनीच अधिक गाजते आहे. या नेत्यांनी एकमेकांवर केलेली व्यक्तीगत चिखलफेक आणि नक्कल यांचाच अधिक समावेश आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यानंतर विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर त्यांनी माफी मागून आपली नक्कल मागे घेतली. त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून 'म्यॅव म्यॅव' असा आवाज काढला. (हेही वाचा, Maharashtra Winter Session 2021: नितेश राणे यांचे ‘म्याऊ… म्याऊ’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपची घोषणाबाजी)

दरम्यान, विधिमंडळ सभागृहात या प्रकरणाचे आज जोरदार पडसाद उमटले. राजकीय नेत्यांची खिल्ली उडवणे आणि त्यांचा अपमान होईल असे वर्तन करणे यावर आक्षेप घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही कोणत्याही राजकीय नेत्याकडून असा प्रकार करणे चुकीचे असल्याचे म्हटले.