राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. या कालावधीमध्ये शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला आहे. चला पाहूया या काळात काय सुरु असेल व काय असेल बंद.
-
-
- राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील.
- रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
- किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
- बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
- सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
- सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.
- खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.
- शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल.
- मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
- सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल.
- उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.
- रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.
- ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील.
- सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.
- शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.
- उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
- चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये.
- बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल.
- कोणतेही राजकीय कार्यक्रम, सभा होणार नाहीत.
- लग्नासाठी 50 आणि अंत्ययात्रेसाठी 20 लोकांनाच परवानगी असेल.
- 5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित केली जाणार. (हेही वाचा: Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्राची चिंता वाढली! राज्यात आज तब्बल 57 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 222 मृत्यू)
Guidelines for containment of COVID-19 #BreakTheChain pic.twitter.com/BLnOTaExc5
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 4, 2021
-
दरम्यान, या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना, आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येईल.