Maharashtra Weather Updates: यंदा होळी पुर्वीच राज्यात वाढला उष्णतेचा पारा; अहमदनगर मध्ये कमाल तापमान 36.8 अंशांवर
प्रतिकात्मक फोटो (Photo credits : Pixabay)

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये यंदा होळी पूर्वीच वातावरणामध्ये उष्णता वाढायला सुरूवात झाली आहे. सध्या किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात 23 फेब्रुवारी दिवशी राज्यभरातील सर्वाधिक तापमान अहमदनगरमध्ये नोंदवण्यात आलं आहे. अहमदनगरमध्ये कालचे तापमान 36.8 अंश सेल्सियस आहे. तर मुंबई शहरामध्ये आजचे कमाल तापमान 35 अंश सेल्सियस पर्यंत पोहचणार असल्याचं सांगण्यात आले आहे. मुंबई हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान 33.5 अंश डिग्री पर्यंत पोहचेल. दरम्यान मागील 24 तासांमध्ये विदर्भात तुरळक पाऊस बरसला. परिणामी राज्यात 26 फेब्रुवारी पासून पुढील 2 दिवस काही भागात उष्णतेपासून थोडा आराम मिळण्याची शक्यता आहे. मुंबई मध्ये तापमान 38.1 अंशावर, मागील 10 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील तिसर्‍या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रात्री थंडावा आणि दिवसा उन्हाचा पारा जाणवत असल्याने अनेक आजारांनी डोकं काढलं आहे. काल महाराष्ट्रात राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद गोंदिया येथे 13.2 अंश सेल्सिअस इतके होते. तर मुंबईत सांताक्रूझ व कुलाबा येथे काल अनुक्रमे 19.1 आणि 20.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 4 अंशांहून अधिक नोंदवण्यात आले आहे. तर मराठवाड्यात बीड येथे किमान तापमान सरासरीपेक्षा सुमारे 5.7 अंशांनी वाढले आहे. बीडचे तापमान 21 अंशांपर्यंत पोहोचले आहे. विदर्भाच्या किमान तापमानातही हळूहळू वाढ होत असल्याने येत्या काही दिवसात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील किमान तापमान 18-19 अंशांदरम्यान नोंदवण्यात आले आहे. मात्र हे तापमान सरासरीपेक्षा 2-3 अंश अधिक आहे.

दरम्यान मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात उष्णता वाढत असल्याने आता ही यंदाच्या उन्हाळ्याची चाहूल असल्याचे संकेत हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.