Mumbai City Temperature: महाराष्ट्रामध्ये ऐन फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढत असल्याने मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या आहेत. दरम्यान आज (18 फेब्रुवारी) मुंबई हवामान खात्याने (Mumbai IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या किमान तापमानामध्येही वाढ झालेली आहे. आज (18 फेब्रुवारी) मुंबईतील कुलाबामध्ये किमान तापमान 22.2 तर सांताक्रुझ मध्ये किमान तापमान 22.4 इतके नोंदवण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक कमाल तापमान 38.1 इतके मुंबईमध्ये काल (17 फेब्रुवारी) नोंदवण्यात आले आहे. हा तीन वर्षांतील सर्वाधिक तापमानाचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. दरम्यान यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान मुंबई शहरात नोंदवण्यात आले आहे. मुंबई प्रमाणेच सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्येही उष्णतेच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये मुंबई शहरात किमान तापमान 24 अंश तर कमाल तापमान 37 अंश इतके राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहरामध्ये जमिनीलगत वाहणारे प्रभावी दक्षिण-पूर्व वारे वाहत असल्याने तसेच आर्द्रतेचे प्रमाण देखील कमी झाल्याने आज मुंबई शहरामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामानामध्ये होणारे हे बदल पाहता मुंबई सह महाराष्ट्रामध्ये आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे, त्याचे स्पष्ट संकेत दिसत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. Summer Tips: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे 10 गुणकारी फायदे.
मुंबई शहराच्या हवामानात झालेली ही वाढ विक्रमी नोंद आहे. 17 फेब्रुवारी दिवशी मुंबईचं तापमान 38 अंशावर पोहचले होते. हे तापमान मागील 10 वर्षांमधील फेब्रुवारीतील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाल तापमान होते. तर तीन वर्षांतील सर्वाधिक तापमानाचा उच्चांक काल नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील तीन दिवसांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातही तापमानात 2-3 अंशांची वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.