Maharashtra Weather Update : विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस
Photo Credit - Twitter

Maharashtra Weather Update : राज्यात दिवसेंदिवस कमाल तापमानात वाढ (temperature increase )होऊ लागली आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वैशाख वणव्याच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. हिवाळा गेल्यानंतर आता उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरीक चांगलेच हैराण झाले आहेत. पहाटे आणि रात्रीच्या वेळी मात्र, किमान तापमानात घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात चढ-उतार सुरु आहेत. त्यातच आता चिंता निर्माण करणारी माहिती समोर आली आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता ( Unseasonal Rain) हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 16 ते19 मार्च दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD Forecast) वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा:Weather Update : कुठे पावसाचं पुनरागमन तर कुठे उन्हाचे चटके; वातावरणातील बदलांमुळे नागरिक हैराण )

हवामान विभागाने तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यात अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 16 ते19 मार्च या तीन दिवसांत या भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्याच महिन्यात विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मार्च महिना सुरु होताच तापमान वाढू लागले. राज्यात बदलणाऱ्या वातावरणामुळे थंडी, ताप आमि अन्य रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. (हेही वाचा :Maharashtra Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग, तापमानवाढीमुळे ऊन्हाचे चटके; जाणून घ्या हवामानाचा अंदाज )

विदर्भात नागपूरसह संपूर्ण विभगात तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. सर्वत्र भकास वातावरण आणि उन्हाचे चटके जानवत आहेत. नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये तापमान 38 अंश सेल्सियसवर गेले आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील सगळ्यात उष्ण वातावरण वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात नोंदवले गेले होते. त्याशिवाय, विदर्भातील काही शहरात 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे सकळी १० नंतर नागरिकांच्या घामाच्या धारा वाहायला सुरुवात होते. नागपूरकर आणि विदर्भवाशीयांना आता वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत असताना शेतकऱ्यांना पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

मागील महिन्यात झालेल्या पाऊस आणि गारपीटमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आता शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.