Maharashtra Weather Forecast: मराठवाडा, पश्चिम विदर्भ मध्ये 24 तासांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता
Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

सप्टेंबर महिना अर्धा सरला आहे. दरम्यान आता पावसाळी ऋतू जाता-जाता महाराष्ट्रात तो काही ठिकाणी जोरदार सरी बरसून राज्याला यंदा अलविदा म्हणत असल्याचं चित्र आहे. आज महाराष्ट्र हवामान अंदाजामध्ये IMD ने 24 तासांत मराठवाडा, पश्चिम विदर्भ या भागात मध्यम ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टी असणार्‍या कोकण प्रांतामध्ये देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहरात मात्र तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई हवामान वेधशाळेचे उपा संचालक के एस होसळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आज पुढील 24 तासांचा हवामान अंदाज शेअर केला आहे. यामध्ये मराठ्वाड्यापासून, विदर्भाचा काही भाग आणि कोकणात पाऊस मुसळधार बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आज पुढील काही तास लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीमध्येही पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात मात्र मध्यम ते तुरळक जोरदार सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई शहर आणि नजिकच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्र हवामान अंदाज

मागील काही दिवस मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक जोरदार पाऊस झाला आहे. यासोबतच वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जना झाल्याने काही नागरिक धास्तावले होते. महाराष्ट्रात जाता-जाता पडणारा हा पाऊस काही ठिकाणी शेतीचं देखील नुकसान करत आहे. महाराष्ट्रात काही भागात मका, मूग अशा धान्यांना हा पाऊस फटका देत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सतर्क राहणं गरजेचे आहे.