Mumbai Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

उन्हाळ्याने हैराण महाराष्ट्रातील लोकांना आता मान्सूनपूर्व सरींमुळे थोडा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रामध्ये कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी, 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे राज्यात आज, 19 मे पासून पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. कोकण, घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 21,22 मे दिवशी 35 ते 45 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांचा वेग 55 किलोमीटर प्रतितास एवढा होऊ शकतो. राज्यात सक्रिय हवामान, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 21 मे पासून अतिमुसळधार पावसासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रात हवामान विभागाचा अंदाज काय?

मुंबई मध्ये 18 मे च्या रात्री पावसाच्या धारा बसरल्या आहेत तर आज सकाळी देखील पाऊस काही भागात रिपरिप पाऊस बरसला असल्याचं पहायला मिळालं आहे. आकाशात काळे ढगही दाटून आल्याचं पहायला मिळालं आहे.

हवामान विभागाने, गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. परिणामी राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून? 

अंदामानात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्याच्या हवामान अंदाजांनुसार, मुंबईत मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे.केरळ ओलांडल्यानंतर आठवडाभरामध्ये मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 11 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज आहे.