Monsoon (Photo Credits: ANI)

राज्यात मागील काही काळापासून जोरदार पाऊस होत आहे. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर, मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाड्याचा भाग, पालघर (Palghar), पुणे (Pune) आणि विदर्भातील काही भागात तीव्र पावसाचे ढग दिसत असून पुढील 3-4 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासहीत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Nashik Lightning Strikes: नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे वणी परिसरात वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू)

त्याचबरोबर या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. उद्यापासून मात्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 13 ऑक्टोबर रोजी राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

के. एस. होसाळीकर ट्विट:

दरम्यान, देशात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील 2-3 दिवसात गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागांमधून आणि मध्य प्रदेश, झारखंड, बिहार या राज्यांच्या बहुतांश भागातून मान्सून माघारी फिरण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.