बँक घोटाळा प्रकरण व शरद पवार यांना होत असलेला त्रास यांमुळे राजीनामा; अजित पवार यांची माहिती
अजित पवार (Photo Credit : Twitter)

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात वारे वाहत आहे ते विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2019). या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल शरद पवार (Sharad Pawar) आणि ईडी (ED) यांचे नाट्य रंगल्यानंतर, संध्याकाळी उशिरा अचानक अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व प्रकरणाबाबत नुकतीच पवार कुटुंबियांची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी  पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले.

या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते, यामध्ये धनंजय मुंडे, छगन बुजबळ, जयंत पाटील यांचा सहभाग होता. पत्रकार परिषदेची सुरुवात जयंत पाटील यांच्या मनोगताने झाली. यावेळी त्यांनी काल दिवसभरात घडलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘काल मी माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. माझ्या या तडकाफडकी  निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला तसेच अनेकांची मने दुखावली त्यांची मी माफी मागतो. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (Maharashtra State Co-op. Bank Scam) जो घोटाळा झाला, आणि जे गुन्हे दाखल झाले त्यामुळे मी हा राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.'

यावेळी त्यांनी या घोटाळ्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले. 'या बँकेत 25 हजार कोटीचा घोटाळा  झाला असे सांगण्यात आले. मात्र ज्या बँकेत साडे अकरा ते 12 हजार कोटींच्या ठेवी आहेत त्या बँकेत इतका मोठा घोटाळा कसा होऊ शकेल? असे असूनही ती बँक अजून कशी चालू आहे? बँक अस्तित्वात आल्यापासून अनेक दिग्गज नेते या बँकेच्या बोर्डावर होते. बँकेत घोटाळा झाल्याचे प्रकरण 2010 चे आहे मात्र आज निवडणुकीच्या तोंडावरच हे गुन्हे का दाखल झाले? हे सर्व बदनामी करण्यासाठी रचण्यात आले आहे व मुद्दाम खोटे आरोप केले जात आहेत.'

या नंतर पवार यांनी बॅंकेबाबत काही गोष्टी नमूद केल्या. ही शिखर बँक आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले असल्यास वेगळ्या मार्गाने, नियमबाह्य मदत करावी लागते. या बँकेने जी काही कर्जे दिली आहेत ती सर्व फिटलेली आहेत. राज्य सरकारने स्वतः हे सांगितले आहे. सध्या या बँकेला वर्षाला 285 कोटी इतका फायदा होत आहे. पुढे अजित पवार यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण कथन केले. या बँकेमध्ये शरद पवार यांचा काहीही संबंध नाही, ते कधीच कोणत्याही बँकेच्या बोर्डावर नव्हते. असे असताना शरद पवार यांच्यावर गुन्हा कसा दाखल झाला? फक्त अजित पवार यांच्यामुळे शरद पवार यामध्ये गोवले गेले. याबाबत अजितदादा अतिशय अस्वस्थ झाले. आपल्यामुळे शरद पवार यांची बदनामी झाली त्यामुळे उद्विग्न होऊन राजीनामा दिला असे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक, पिंपरी चिंचवड येथून महापालिकेच्या नगरसेवकाने सोडले पद)

'फक्त शरद पवार यांना त्रास नको म्हणून मी हा निर्णय घेतला. या सर्व बाबतील मी अस्वस्थ होतो. तसेच ज्या प्रकारे माध्यमांनी या सर्व प्रकरणाच्या बातम्या दिल्या ती गोष्टही अस्वस्थ करणारी होती. आज अजित पवार हे बोर्डावर नसते तर ही केस उभी राहिलीच नसती. आम्हीही माणसे आहोत, आम्हालाही भावना आहेत,' असेही ते म्हणाले.

पुढे त्यांनी पवार कुटुंबियांमध्ये कोणताही गृहकलह नसल्याचे सांगितले. 'आमच्या घरात शरद पवार सर्वात मोठे, अनुभवी आहेत त्यामुळे अजूनही आम्ही सर्व त्यांचेच म्हणणे ऐकतो. आमच्यामध्ये कोणताही कलह नाही, उद्या शरद पवार जसे म्हणतील तसेच मी वागेन.' अशाप्रकारे बँक घोटाळा, होत असलेली बदनामी आणि शरद पवार यांचे यात गोवलेले नाव यांमुळे उद्विग्न होऊन राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.