Maharashtra SSC, HSC Supplementary Time Table 2020: 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर पासून होणार सुरू; इथे पहा सविस्तर वेळापत्रक
Exam Dates| Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

Maharashtra SSC, HSC Supplementary Time Table 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या 20 नोव्हेंबरपासून पुरवणी परीक्षा सुरू होणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत ही पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या mahahsc.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरम्यान, फेब्रुवारी-मार्च 2020 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेचं इयत्ता 12 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या, याशिवाय एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागतीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. (वाचा - SSC, HSC Re Examination 2020: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये; अर्ज भरण्याची मुदत, पद्धत घ्या जाणून)

सदर परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने WWW.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायच्या आहेत. यासंर्भातील तारखा जाणून घेण्यासाठी mahahsc.in येथे क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, माध्यमिक शालान्त म्हणजेच इयत्ता 10 वी ची लेखी परीक्षा 20 नोव्हेंबर व 5 डिसेंबर 2020 दरम्यान घेण्यात येणार आहे. याशिवाय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12 वी च्या सर्वसाधारण व द्विलक्षी विषय परीक्षा 20 नोव्हेंबर व 10 डिसेंबर 2020 दरम्यान पार पडणार आहेत. तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षा 20 नोव्हेंबर आणि 7 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहेत.