
अनंत चतुर्दशीला राज्यभर गणपती विसर्जन असतानाच वरुणराजाही हजेरी लावणार आहे. राज्यात उद्या होणाऱ्या अनंत चतुर्दशीला वरुण राजाची उपस्थिती राहणार असून पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात पावसाचे आगमन उशीरा झाल्याने राज्यात पाणीप्रश्न निर्माण झाला होता. यानंतर राज्यात पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. यामुळे सध्या सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटला असून शेतकरी देखील सुखावला आहे. (हेही वाचा - Pune Rain: पुण्यात मुसळधार पाऊस, गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने हजेरी लावली असून अनंतचतुर्दशी सह पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज पुणे, वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात 3 ते 4 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने सांगितले. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत 96% पाऊस पडल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान मंगळवारी रात्री पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. पण बुधवारची पहाट उगवताच पावसाने थोडीफार विश्रांती घेतली. त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकर घराबाहेर पडले. मात्र, 11 वाजेच्या सुमारास पुण्यात पुन्हा ढग दाटून आलं आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली.