MPSC Exams Updates: 14 मार्चला होणारी एमपीएससी पूर्व परीक्षा कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लांबणीवर; नवे वेळापत्रक लवकरच
MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

महाराष्ट्रात कोरोना वायरसचं संकट अद्यापही शमलेले नाही. राज्यात मागील वर्षभरापासून कोविड 19 च्या रूग्णसंख्येमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहेत. आता पुन्हा राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी एमपीएससी पूर्व परीक्षा 2020 पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. मंडळाने परिपत्रक जारी करत त्याची माहिती दिली आहे. . कोविड 19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात येत आहे तसेच परीक्षेची नवी तारीख यथावकाश जाहीर केली जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

दरम्यान एमपीएससी पूर्वपरीक्षा 2020 पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील कधी कोविड 19 जागतिक आरोग्य संकट तर कधी राज्यातील मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे परीक्षेच्या ऐन काही दिवस आधी अशाप्रकारे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. इथे पहा सविस्तर माहितीपत्रक .

सध्या वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही ठिकाणी अंशत: तर काही ठिकाणी कडक लॉकडाऊनच्या घोषणा झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांना प्रवास करताना त्रास होण्याची देखील शक्यता होती. सोबतच वाढती रूग्णसंख्या पाहता आता खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून देखील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे.

यंदाच्या वर्षी 2.5 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. विविध विभागांमध्ये 200 पदांवर भरती होणार आहे. 23 डिसेंबरला या परीक्षेचं नोटिफिकेशन जारी झालं आहे तर 13 जानेवारी 2020 पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करत विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.