चांद्रयान 2 च्या मोहिमेत मराठी चेहरा; अहमदनगरच्या प्रदीप देवकुळे यांच्याकडे संदेशवहनाच्या यंत्रणेची जबाबदारी
Chandrayaan 2 Launch (Photo Credits: Twitter)

भारताची दुसरी महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम चांद्रयान 2 (Chandrayaan 2 ) अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं आहे. इस्त्रो (ISRO) च्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. अमेरिकेच्या 'नासा' पासून देशात राजकारणी, सेलिब्रिटी यांच्यासह सामान्यांनादेखील चांद्रयान 2 बद्दल विशेष कुतूहल होतं. 22 जुलै दिवशी चंद्रयान अवकाशात अपेक्षेप्रमाणे झेपावल्याने सार्‍यांनीच आनंद व्यक्त केला आहे. इस्त्रोचे संशोधक या मोहिमेवर मागील अनेक महिन्यांपासून मेहनत करत आहेत. या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या टीममध्ये एक मराठमोळा चेहरा देखील आहे. अहमदनगरचे प्रदीप देवकुळे(Pradeep Devkule)  यांनी चांद्रयान 2 मध्ये संदेशवहन करणाऱ्या यंत्रणेच्या टीमचं नेतृत्त्व केलं आहे. ISRO ची महत्वाकांक्षी चंद्रमोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांद्रयान 2 चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. त्यानंतर चंद्रावरील माहिती भारताच्या इस्त्रोच्या कार्यालयात शास्त्रज्ञांना देण्यासाठी आवश्यक यंत्रणा यांची जोडणी, जुळवणी करण्याचं काम प्रदीप देवकुळे यांच्यावर आहे.‘प्रज्ञान रोव्हर’ने गोळा केलेली माहिती ‘विक्रम लँडरकडे’दिली जाणार, पुढे विक्रम लँडरकडून ही माहिती ऑर्बिटरकडून पृथ्वीवर येणार आहे. या कार्यामध्ये आवश्यक अँटिना, रिसिव्हर, ट्रान्समीटर तयार करण्याची जबाबदारी प्रदीप देवकुळे आणि त्यांच्या टीमकडे आहे. 2008 पासून देवकुळे इस्त्रो च्या कार्यालयात संदेशवहनासाठी कार्यरत आलेल्या टीममध्ये आहेत. चांद्रयानापूर्वी त्यांनी मंगळयान मोहिमे मध्येही काम केलं आहे.

प्रदीप देवकुळे हे अहमदनगर शहरातील भिंगार गावाचे आहे. भिंगार विद्यालयात शालेय शिक्षण पूर्‍ण झाल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगची डिग्री घेतली. पुढे त्यांना इस्त्रोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. चांद्रयान 2 मोहिमेतील त्यांच्या योगदानामुळे देवकुळेंवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी GSLV-Mk III प्रक्षेपकाद्वारा चांद्रयान 2 अवकाशामध्ये झेपावलं आहे.चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे.