
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रत्नागिरीतील (Ratnagiri) सभेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांना मिमिक्री करण्याशिवाय दुसरं येतंच काय? असा प्रश्न करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं आहे. मागे त्यांनी 14 आमदार निवडून आणले होते. दुसऱ्या टर्मला एक आमदार आला.अजित पवारांवर मिमिक्री करणं आणि अजित पवार यांचं व्यंगचित्र काढणं यात समाधान वाटतं. यातून ते समाधानी होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्याची घोषणा करण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला अजित पवार नव्हते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते पत्रकारांवरच भडकले. पवार साहेबांना आम्ही भेटायला गेल्यानंतर पवार साहेब म्हणाले, त्यांचे कलिग म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेला हजर राहावं. प्रांत अध्यक्ष म्हणून जयंतरावांनी उपस्थित राहावं. केरळचे प्रतिनिधी म्हणून आमदार आले होते. त्यांनी उपस्थित राहावं. नॉर्थमधील नेते होते. पीसी चाको निघून गेले. अशा ठरावीक लोकांनी उपस्थित राहण्याचं ठरलं. पत्रकार परिषदेत चारपाच खुर्च्या असतात. त्यामुळे साहेब म्हणाले, बाकी येऊ नका. साहेबांचा आदेश शिरसावंद्य. काही अडचण?, असा प्रश्न अजितदादांनी केला.