शिवसेना (Shiv Sena) जागेवरच आहे. फक्त आमदार सोबत नाहीत. ते आमदार गुवाहाटीला गेले आहेत. कशाला? ती झाडी, ते डोंगार.. ते हाटील बघायला गेले आहेत. इकडून तिकडे गेले आहेत आणि तिथे कैद्याप्रमाणे बसले आहेत, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना लगावला आहे. ते अलिबाग येथे शिवसेना मेळाव्यात बोलत होते. या वेळी त्यांनी अलिबागचे दादा ठाण्याचया भाईला भारी पडतील, असा इशाराही संजय राऊत यांनी या वेळी दिला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी येथे असेल्या शिवसेना बंडखोर आमदारांच्या गटावर जोरदार टोलेबाजी करत संजय राऊत यांनी आपल्या मिष्कील भाषेच चिमटेही काढले. तुम्हाला आमचे आजही आवाहन आहे. तुम्ही गुवाहाटीतून परत या. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते उद्धव ठाकरे यांना समोर येऊन सांगा. तुम्हाला महाविकासआघाडीतून बाहेर पडायचे आहे? पडू. पण तुम्ही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर येऊन सांगा. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: परत फिरा, आजही मला तुमची काळजी वाटते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर शिवसेना आमदारांना अवाहन)
संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमपणे शिवसेनेची बाजू ठासून मांडली. शिवसेना सोडून जे गेलेत त्यांचं काय झाले हा इतिहास आहे. आज गुवाहाटीत गुलामासारखे हॉटेलात बसलेले सांगत आहेत शिवसेना आमची. अरे तुमची कसली शिवसेना? पाठीमागील 56 वर्षांमध्ये अनेकांनी प्रयत्न केले शिवसेना सोडण्याचे, फोडण्याचे. पण शिवसेना आणि ठाकरे ही एकाच नाण्याच्या दोन बाजू नव्हे, शिवसेना आणि ठाकरे ही नाण्याची एकच बाजू आहे. दुसरी बाजूच नाही. जिकडे ठाकरे तिच खरी शिवसेना, असे संजय राऊत यांनी या वेळी ठासून सांगितले.
शिवसैनिकांनी अधिक भक्कमपणे एकजूट होण्याची वेळ आलेली आहे. आता 'गद्दारांना क्षमा नाही', 'चुकीलाही माफी नाही' आणि काही केले तरी झुकेंगे नाही, असा डायलॉग फेकत संजय राऊत यांनी गुवाहाटीतील बंडखोरांना इशारा दिला. आज जे गुवाहाटीत गेले आहेत त्यांनी आपली राजकीय कबर स्वत:हूनच खोदली आहे. जनताच त्यावर माती टाकेल असेही संजय राऊत म्हणाले.