Uddhav Thackeray, Shiv Sena | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा अवाहन केले आहे. परत या. भेटा. समोरासमोर भेटून बोलू. शिवसैनिक आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. कुटुंबप्रमुख म्हणून मला तुमची काळजी वाटते आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना अवाहन केले आहे.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आपल्याबद्दल रोज काही ना काही नवीच माहिती पुढे येत आहे. आपण गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. तुमच्यापैकी अनेक जण संपर्कातही आहेत. आपल्यापैकी काही जणांच्या कुटुंबीयांनीही माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. त्या भावनांचा मी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आपल्या भावनांचा पूर्ण आदर करतो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: 'महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांनी सोबतच्या आमदारांची नावे सांगावीत', एकनाथ शिंदे यांचे आव्हान )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, मी कुटुंबप्रमुख म्हणून आपल्याला सांगतो. वेळ अजूनही गेली नाही. आपण या, माझ्यासमोर बसा. जनता आणि शिवसैनिक यांच्या मनात जो संभ्रम झाला आहे तो दूर करा. आपण एकत्र बसूनच यातून मार्ग काढू. आजकाल अनेक लोक आपल्याला आमिशं दाखवत आहेत. भुलथापांना बळी पडू नका. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ट्विट

दरम्यान, आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. आमचे पुढचे पाऊल आम्ही लवकरच स्पष्ट करु. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे बऱ्याच काळानंतर गुआहाटी येथील हॉटेलबाहेर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना महाराष्ट्रातील विद्यमान स्थितीबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी अगदी त्रोटक शब्दांत एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.