Uddhav Thackeray Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Eknath Shinde on Shiv Sena: आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. आमचे पुढचे पाऊल आम्ही लवकरच स्पष्ट करु. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे बऱ्याच काळानंतर गुआहाटी येथील हॉटेलबाहेर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना महाराष्ट्रातील विद्यमान स्थितीबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी अगदी त्रोटक शब्दांत एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, दिपक केसरकर हे आमच्या शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत. ते आपल्यासमोर योग्य आणि आवश्यक ती भूमिका मांडत राहतील. त्यामुळे मी फारसा बोलणार नाही. आपल्याला जी माहिती हवी आहे ती आपण दिपक केसरकर यांना विचारा, असेही शिंदे म्हणाले. दरम्यान, आमच्यासोबत आलेले आमदार हे स्वमर्जीने आले आहेत. समोरुन जे सांगत आहेत की, आमच्यासोबत येवढे आमदार आहेत आणि तेवढे आमदार आहेत. त्यांनी थेट त्या आमदारांची नावे सांगावीत. महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावे सांगावी, असे आव्हानच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्यांना दिले आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: विधिमंडळात बहुमत चाचणी घ्या, एकनाथ शिंदे गटाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान)

ट्विट

गुआहाटी येथे असलेले आमदार माझ्या सोबत स्वमर्जीने आले आहेत. इतकेच नव्हे तर ते सर्वजण इथे आनंदात आहेत. आपण काळजी करु नये. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जातो आहोत. त्यामुळे काळजी नसावी असेही एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीनंतर प्रथमच ते जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.