Maharashtra Political Crisis: विधिमंडळात बहुमत चाचणी घ्या, एकनाथ शिंदे गटाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान
Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेतील बहुतांश आमदारांचा पठींबा आहे. त्यामुळे विधिमंडळात सरकार अल्पमतात आहे. हवे तर विधिमंडळात सरकारने थेट बहुमत चाचणी (Floor Test) घ्यावी असे थेट आव्हान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला दिले आहे. महाराष्ट्रात सध्या जे वातावरण आहे. ते वातावरण निवळले की लगेचच गुवाहाटी येथे थांबलेले आमदार महाराष्ट्रात यायला तयार आहेत. आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही. तरीही आम्हाला गद्दार का म्हणता? शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आम्हाला 'रेडे', 'गद्दार' म्हणतात त्यामुळे गुवाहाटीतील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असेही केसरकर म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दिपक केसरकर यांनी म्हटले की, आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. आमची भावना ही पक्षप्रमुखांनी आमचे ऐकावे अशीच आहे. आज राज्यात आम्हाला जे धमकवण्याचे काम सुरु आहे त्याला वेळीच आवर घालण्यात यावी. शेवटी आमचाही एक संयम आहे. आम्हाला कोणावर टीका करायची नाही. पण जर सातत्याने आमच्या कुटुंबीयांवर आमच्यावर टीका, हल्ले करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवसैनिक रस्त्यावर उतरतो आहे. असे असताना आम्हालाही आत्मसन्मान आहे. आम्हालीही नाईलाजाने प्रत्युत्तर द्यावे लागेल. खरे तर आम्हाला आमच्या नेतृत्वावर, शिवसेनेवर बोलायचे नाही. परंतू, शिवसेना खासदार संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यामुळे आम्हाला आमचा संयम सोडावा लागेल, असा इशाराही दिपक केसरकर यांनी दिला आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे भाजपचे कारस्थान, शिवसेनेचा दावा)

गुवाहाटी येथे असलेल्या सर्व आमदारांना महाराष्ट्रात यायचे आहे. आम्हाला महाराष्ट्रात यायला केवळ संजय राऊत यांनी रोखले आहे. राऊत यांच्या विधानांमुळेच शिवसैनिक रस्त्यांवर उतरला आहे. महाराष्ट्रात ही जी नाटकं सुरु आहेत ती थांबवावीत. ती थांबली तर आम्ही महाराष्ट्रात नक्कीच येऊ. पण केवळ संजय राऊत यांच्यामुळेच आम्हाला महाराष्ट्रात येत नाही. कारण त्यांनीच शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवले आहे, असा आरोप दिपक केसरकर यांनी केला आहे.

दरम्यान, गुवाहाटी येथील पंचतारांकीत हॉटेलचा खर्च कोण करते आहे? याबाबत विचारले असात दिपक केसरकर यांनी थेट उत्तर देणे टाळले. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलचे बिल आम्ही भरु शकतो. राज्यसभा, विधानपरिषद निवडणुका झाल्या त्याही वेळी पक्षाने आम्हाला पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले होते. त्या वेळी आपण आम्हाला विचारले का? खर्च कोण करतं. आमचा खर्च आम्ही करु शकतो, असले दिपक केसरकर म्हणाले. असे असले तरी त्यांनी हा खर्च नेमका कोण करते आहे याबाबत बोलणे मात्र त्यांनी टाळले.