Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर मविआ सक्रीय, शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक, डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: ANI)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचे स्थिरताच धोक्यात आली आहे. त्यामुळे हे बंड मोडून काढण्यासाठी आता महाविकासआघाडी सक्रीय झाली आहे. खास करुन मविआचे प्रणेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे स्वत: सक्रीय झाले आहेत. त्यामुळे आता ही लढाई केवळ शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न म्हणून सोडला जाणार नाही तर, मविआ म्हणून सोडवला जाणार आहे. परिणामी आगामी काळात कायदेशीर लढाईला तोंड द्यावे लागू शकते. याचाच विचार करुन सरकार टीकविण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशिर लढाई मविआ एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवास्थानी मविआच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार दिल्लीला जाणार असल्याची सूत्राची माहिती आहे.

सिल्वर ओक येथे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीला मविआचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यात शिवसेनेचे अनिल देसाई, अनिल परब, काँग्रेसकडून अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, तर राष्ट्रवादीकडूनही ज्येष्ठ नेते उपस्थित होते. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या गटात चलबिचल, आमदारांचे मध्यस्थीसाठी महाराष्ट्रात शिवसेना नेत्यांना फोन)

सांगितले जात आहे की, मविआ नेत्यांच्या बैठकीत प्रामुख्याने दोन गोष्टींवर चर्चा झाली. पहिली अशी की, लढाई जर कोर्टात गेली तर ही लढाई मविआ म्हणून एकत्र लढायची. कारण सर्वजणच कयास लावत आहेत की, शिवसेनेने दिलेल्या आमदारांच्या निलंबन प्रस्तावावर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कारवाई करत शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवले तर त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल. दुसऱ्या बाजूला शिवसेना गटनेता म्हणून निवडण्यात आलेल्या अजय चौधरी यांच्या निवडीला शिंदे गटाचा विरोध आहे. त्यामुळे शिंदे गट हा न्यायालयात जाण्याची भाषा करु लागला आहे.

दुसरा मुद्दा असा की, शिंदे गटात गेलेल्या आमदरांना परत आणण्यासाठी मविआ सरकार म्हणून एकत्रित प्रयत्न करण्यात यावे. जरी ते आमदार शिवसेनेचे असले तरीसुद्धा त्यांना परत आणण्यासाठी सामूहिक प्यत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे मविआतर सध्या जोरदार सक्रीय झाली आहे. आता पुढे काय घडते याबाब राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली आहे.