Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या गटात चलबिचल, आमदारांचे मध्यस्थीसाठी महाराष्ट्रात शिवसेना नेत्यांना फोन
Eknath Shinde (Pic Credit - ANI)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेत बंड करुन गुवाहाटी येथील हॉटेलला पोहोचलेल्या आमदारांच्या गटामध्ये प्रचंड चलबिचल आहे. हा गट अनेक व्हिडिओ जारी करुन शक्तिप्रदर्शन करत असला तरी गटामध्ये मोठ्या प्रमाणावर आंतर्विरोध पसरला असल्याची माहिती आहे. आपले नेमके पुढे काय होणार याबाबत अनिश्चितता असल्याने अस्वस्थता वाढते आहे. त्यामुळे गटांमधील आमदारांमध्ये परस्परांमध्ये विविध मुद्द्यांवरुन वादविवादही सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून या गटातील आमदार आता महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) नेत्यांशी संपर्क करु लागले आहेत. काहीही करा आणि आम्हाला गुवाहाटीतून बाहेर काढा, अशी मागमी हे आमदार करु लागल्याचा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एबीपी माझा वृत्तवाहिनीवर एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटात गेलेल्या एकूण आमदारांपैकी 21 आमदार आमच्या थेट संपर्कात असल्याचे म्हटले आहे. दोन आमदार तर आगोदरच मुंबईमध्ये परतले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात हे आमदार आमच्याकडे परत येतील. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रात आल्यावरही हे आमदार परत येतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: प्रिय शिवसैनिकांनो..! एकनाथ शिंदे याची फेसबुक पोस्ट, बंडाचे कारणही सांगितले)

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरै यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी त्यांना फोन केला होता. बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत. बोरणारे यांनी चंद्रकांत खैरे यांच्याकडे मध्यस्थीसाठी विचारना केली. काहीही करा मध्यस्थी करा आणि आम्हाला परत घेऊन चला, असे म्हटले आहे. त्यावर खैरे यांनीही तुम्ही परत केव्हा याल? तुम्ही परत आल्यावर मी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जातो असे म्हटले.