Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांनी Remdesivir पुरवठादारांना त्रास दिला- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (File Photo)

रेमडेसिवीर (Remdesivir) इंजक्शन तुटवड्यावरुन सुरु झालेले केंद्र विरुद्ध राज्य हे नाट्य काल भलतेच रंगले. हे नाट्य थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले. प्राप्त माहितीनुसार Bruck Pharma कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले. या संचालकांना चौकशीसाठी पार्ले पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर यांना माहिती कळताच त्यांनी थेट पार्ले पोलीस ठाणे गाठले. या वेळी त्यांच्यासोबत आमदार प्रसाद लाड हेदेखील होते. या वेळी देवेंद्र फडणवीस आणि पोलीस यांच्यात वाद झाल्याचे प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे, असे असतानाच राज्यात रेमडेसिवीर औषधांचाही तुटवडा जाणवत आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होता की, महाराष्ट्राला रेमडेसिवीर देऊ नये यासाठी औषध कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव आहे. यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनीही ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले होते. यावरुन पुढे बरेच राजकीय नाट्य घडले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्यातील एका मंत्र्याच्या ओएसडीने Bruck Pharma कंपनीच्या लोकांना फोन करुन धमकावले. या कंपन्या भाजपला इंजेक्शनचा साठा कसा काय देतात? असा सवाल करत या ओएसडीने Bruck Pharma कंपनीच्या लोकांना धमकावल्याचे फडणवीस म्हणाले. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांना लावला फोन, मात्र समोरून मिळाले 'हे' उत्तर)

दरम्यान, पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, राज्यात रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा आहे. तशा तक्रारीही आहेत. असे असताना काही औषध कंपन्यांनी औषधांचा मोठा साठा करुन ठेवल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही काही लोकांना चौकशीसाठी बोलावले होते. ही प्राथमिक स्वरुपाची चौकशी होती असेही पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.