Maharashtra Onion Crisis: महाराष्ट्र सरकार खरेदी करणार 400 कोटी किमतीचा कांदा; गरीब शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे मंत्री Abdul Sattar यांचे आश्वासन
Onion | Representational image (Photo Credits: pxhere)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील व्यापारांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढण्यासाठी, आज कृषी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कांदा उत्पादन, खरेदी तसेच विक्री दराविषयी 140 कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारांच्या समस्या सुरु आहेत. या समस्येच्या निदानासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासमवेत मुंबई येथे बैठकाही पार पडल्या होत्या. यासंदर्भात कृषी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पणन मंत्री सत्तार यांनी व्यापारांच्या समस्या संदर्भात तातडीने लक्ष घालून हा विषय सोडविण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल केंद्रीय मंत्री गोयल यांचे आभार मानले. कांदा उत्पादक शेतक-यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत.

यापूर्वी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र शासनाने 2 हजार 410 रूपये प्रतिक्विंटल दराने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन्ही संस्थांकडून अत्यंत कमी प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून, नाफेड तसेच एनसीसीएफ या संस्थांनी प्रत्येकी एक-एक लाख टन कांदा आणखी खरेदी करण्याबाबत केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती मंत्री सत्तार यांनी यावेळी दिली. आता 400 कोटी रूपयांची आणखी कांदा खरेदी करण्यात येईल. कुठल्याही परिस्थिती मध्ये गरीब शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. (हेही वाचा: Marathi Woman Denied House in Mulund: मुजोरांना अटक, मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता-पुत्रावर गुन्हा दाखल)

सरकारच्या मागणीप्रमाणे ज्या ज्या भागात कांदा शिल्लक असेल तिथे माल खरेदीला परवानगी दिली जाणार. तसेच नवीन कांदा खरेदी केंद्र उभारले जातील. याबाबत मार्केटिंग फेडरेशनने देखील सहमती दर्शवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कांदा खरेदी व खरेदी केंद्रांबाबत शासनाकडून दररोज वर्तमानपत्रात जाहिरातीव्दारे माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने कांद्यासाठी 40  टक्के निर्यात शुल्क लावले आहे आणि ते कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांची मागणी होती. याबाबत केंद्र शासनाकडून उच्चस्तरीय समितीने दिलेल्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.सत्तार यांनी दिली.