महाराष्ट्रात आज COVID19 च्या आणखी 8139 रुग्णांची भर तर 223 जणांचा बळी; राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2,46,600 वर पोहचला
Coronavirus (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात कोविड19 च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्रात आज आणखी 8139 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 4360 जणांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला असून 223 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.(Lockdown In Pune: पुण्यात येत्या 13-23 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर, पहिल्या टप्प्यात 'या' गोष्टी सुरु राहणार)

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून आता 2,46,600 वर पोहचला आहे. त्यापैकी 99,202 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,36,985 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 10,116 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सराकरकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे.(धारावीत COVID19 वर मिळवलेले नियंत्रण हे जगासाठी प्रेरणादायी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र मृत्यूदर कमी ठेवण्याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाईल असे सुद्धा टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.