Nitin Gadkari (PC - ANI/Twitter)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्रातील वाशिम येथे 3,695 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग (एनएच) प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. गेल्या नऊ वर्षात वाशिम जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा 227 किलोमीटर महामार्ग बांधण्यात आला. महाराष्ट्रातील अकोल्यामधून तेलंगणातील संगारेड्डी येथे जाणारा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग 161 हा दोन्ही राज्यांमधील व्यापार अधिक मजबूत करणारा दुवा ठरला आहे.

एकूण तीन पॅकेज मध्ये विभागलेले, अकोला ते मेडशी या महामार्गावरील 48 किमी आणि 1,259 कोटी रुपये खर्चाच्या पहिल्या पॅकेजमध्ये चार एअर पूल, 10 अंडरपास आणि 85 कल्व्हर्ट आहेत. मेडशी ते वाशीम या 45 किमी अंतराच्या 1,394 कोटी रुपये खर्चाच्या पॅकेजमध्ये 13 बस आश्रयस्थान, सहापदरी रोड ओव्हर ब्रिज आणि वाशिम शहर बायपासचा समावेश आहे. याशिवाय पांगरी ते वारंगाफाटा या 42 किमी आणि 1042 कोटी रुपये खर्चाच्या पॅकेजमध्ये कयाधू नदीवरील मुख्य पूल, कळमनुरी आणि आखाडा-बाळापूर सिटी बायपासचा समावेश आहे.

अकोला, वाशिम, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक महत्वाची ठिकाणे आता जोडली जातील. शेगावचे गजानन महाराज मंदिर, अकोला शाहनूर किल्ला, अंतरीक्ष जैन मंदिर, आठवे ज्योतिर्लिंग औंढा-नागनाथ, संत नामदेव महाराज संस्थान, नरसी आणि नांदेडमधील तख्त सचखंड गुरुद्वारा यांसारख्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देणे आता सोपे आणि सुलभ होणार आहे. तसेच महामार्गांमुळे  महाराष्ट्र आणि तेलंगणामधील व्यवसाय संधी सुलभ होऊन रोजगार निर्मिती देखील वाढीला लागेल. (हेही वाचा: Mumbai Local Power Block On Harbour Line: हार्बर मार्गावर 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान बेलापूर- पनवेल स्थानकामध्ये 38 तासांचा ब्लॉक)

‘अमृत सरोवर’ योजनेंतर्गत सावरगाव बर्डे, झोडगा खुर्द, चिवरा, आमणी, सायखेडा किंवा इतर गावातील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात आले व त्यातून निघालेली माती आणि वाळू या राष्ट्रीय महामार्ग 161 च्या बांधकामात वापरण्यात आली आहे.