मुंबई (Mumbai) सह महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रतीक्षेनंतर वरुणराजाचं आगमन झालं खरं, पण या पावसाचा एक फटका जवळपास 20 हुन अधिक लोकांच्या जीवावर बेतला आहे. काल पासून पावसाने मुंबई, पुणे (Pune) , नांदेड (Nanded) , अकोला (Akola) येथे अक्षरशः थैमान घातले होते, अद्यापही सर्वत्र पाऊस सुरु आहे .या पावसात कुठे भिंत अंगावर कोसळून तर कुठे साचलेल्या पाण्यात शॉक लागून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काल पासून सुरु असलेल्या या पावसाच्या बळींचा घेतलेला हा आढावा..
अंधेरी मधील आरटीओ ऑफिस समोर एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा तर ठाणे येथील राबोडी परिसरात 46 वर्षीय गृहस्थाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. याशिवाय काल गोरेगाव परिसरात सुद्धा अशाच प्रकारे दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. नांदेड मध्ये शेतात काम करत असणाऱ्या सुशीला सुरने व त्यांचा चार वर्षीय चिमुकला राजेश हे देखील विजेच्या धक्क्याचे बळी ठरले आहेत. तर अकोला मधील बोरकवाळी येथे अंगावर वीज कोसळून शेतातील 55 वर्षीय बाळू उमाळे व 15 वर्षीय दीपक शेगोकार यांचा अंत झाल्याचे समजत आहे. यासोबतच नागपूर मध्ये शाळेच्या परिसरात वीज कोसळल्याने आठ विद्यार्थ्यंचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे साहजिकच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळतेय.
दुसरीकडे पुण्यात कोंढवा येथे काल मध्यरात्री एका इमारतीची सुरक्षाभिंत कोसळल्याने 15 ते 17 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महिला व लहानग्यांचा सुद्धा समावेश आहे.तर अंबरनाथ येथे एका रिक्षावर झाड कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे , यामध्ये अन्य तीन प्रवासी सुद्धा जखमी झाले होते. या पाठोपाठ चेंबूर मध्ये रात्री पार्किंग मध्ये ठेवलेल्या रिक्षांवर भिंत कोसळली होती, सुदैवाने यावेळी रिक्षांमध्ये कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. तर भिवंडी व जवळच्या परिसरात अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठले होते, यामध्ये खेळताना काल अरमान मंसुरी नामक एका दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.
अवघ्या 24 तासातच पावसाचे रुद्र रुप समोर आल्याने प्रशासनच्या कामावर सुद्धा प्रश्न उभारले जातायत, पावसाळापूर्वी कामांमध्ये जर विजेच्या तरुणाचा योग्य बंदोबस्त केला असता तर हे प्रसंग टाळता आले असते असा सूर सामान्य जनतेकडून धरला जात आहे.