Maharashtra Monsoon Updates: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे शहरात आज पावसाचा जोर ओसरणार: स्कायमेटचा अंदाज
Monsoon Update (Photo Credits: Pixabay)

29 July Maharashtra Monsoon predictions: मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरात शुक्रवार (26 जुलै)च्या दुपारपासून कोसळणारा पाऊस आता थोडा शांत झाला आहे. आज सोमवार (29 जुलै) दिवशी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असलं तरीही पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणार्‍या खाजगी संस्थेने दिला आहे. मात्र सध्या मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा असल्याने विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असल्याने मुंबई, गोवा, कोकण या पश्चिम किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुण्यातही पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई-पुणे रेल्वेसेवा आजपासून पुर्वपदावर, आज लांब पल्ल्यांच्या 2 एक्सप्रेस रद्द

पुण्यामध्ये मागील काही तासांत मुंबईप्रमाणेच जोरदार पाऊस बरसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. तर पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय असल्याने 2-3 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात कमाल तापमान 26 ते किमान तापमान 21 अंश राहणार आहे. वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने वारेदेखील मध्यम गतीने वाहतील असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

स्कायमेटचा आजचा हवामान अंदाज

मुंबई,ठाणे शहराला शुक्रवारी रात्री पावसाने झोडपल्यानंतर अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. घरात, दुकानांमध्ये घुसलेले पाणी सुमारे 22 तासांनंतर ओसरायला सुरूवात झाल्याने आता हळूहळू वातावरण पुन्हा रूळावर येण्यास सुरूवात झाली आहे.