कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मोनो (Monorail) आणि मेट्रो (Metro) सेवा मुंबईकरांसाठी पुन्हा सुरु होणार आहे. आजपासून (18 ऑक्टोबर) मोनोरेल सेवेला सुरुवात होणार असून मेट्रो सेवा उद्यापासून (19 ऑक्टोबर) खुली करण्यात येणार आहे. आजपासून सुरु होणारी मोनोरेल सेवा चेंबूर ते जेकब सर्कल पर्यंत धावणार आहे. या दोन्ही वाहतुक सेवा कोविड-19 लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनपासून बंद आहेत. 22 मार्चला बंद झालेलल्या या सेवा तब्बल 7 महिन्यांनंतर पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.
मोनोरेल 210 दिवसानंतर आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. ही सेवा सकाळी 7.09 ते 11.15 वाजेपर्यंत आणि दुपारी 4.09 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहील. सकाळच्या सदरात 14 फेऱ्या आणि संध्याकाळीच्या वेळी 16 फेऱ्यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, एन्ट्री पॉईंट्सची संख्या मर्यादीत असेल. (Mumbai Local Train Update: महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेकडून नामंजूर)
प्रवाशांसाठी नियम:
# प्रवाशांनी कमीत कमी सामान जवळ बाळगावे.
# तसंच हँड सॅनिटायझर कॅरी करावे.
# प्रवासादरम्यान मॅटॉलिक वस्तू सोबत ठेवू नये.
MMRDA आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले की, "कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्यावा."
सध्या मेट्रोच्या 200 फेऱ्या सकाळी 8.30 ते रात्री 8.30 च्या दरम्यान धावणार आहेत. लॉकडाऊनपूर्वी मेट्रोच्या दररोज 400 फेऱ्या सुरु होत्या. सकाळी 6.30 ते 11.30 दरम्यान धावणाऱ्या या मेट्रो फेऱ्यांमधून तब्बल 4.5 लाख प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मेट्रो सेवेदरम्यान नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्याच व्यक्ती मेट्रोतून प्रवास करु शकतात. त्यासाठी मेट्रोच्या एन्ट्री पॉईंटला कियॉस्क सेटअप करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचे बॉडी टेम्परेचर चेक करता येईल. तसंच स्टेशन्सवर हँड सॅनिटायझर्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी नियम:
# मास्क घालणे अनिर्वाय असणार आहे.
# मेट्रो तिकीटासाठी आता प्लॉस्टिकचे टोकन देण्यात येणार नाही. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना पे वॉईट, मेट्रो स्मार्टकार्ड आणि पेपर क्यूआर तिकीटचा वापर करता येईल.
विशेष म्हणजे मेट्रो सेवेदरम्यानही एन्ट्री आणि एक्सिट गेटची संख्या पूर्वीपेक्षा कमी असेल. तसंच एका रॉऊड ट्रिपनंतर मेट्रोची स्वचछता केली जाईल. यात जिने, हॅंडरेल्स, तिकीट काऊन्टर, प्लॅटफॉर्म बेंचेस एस्केलेटर यांचाही समावेश असेल.