आजपासून (17 ऑक्टोबर) सर्व महिलांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करु देण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. परंतु, रेल्वे बोर्डाने त्यास असमर्थता दर्शवली आहे. मध्य रेल्वेने सर्व महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी देता येणार नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात रेल्वेने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. यात सर्व महिलांना 17 ऑक्टोबरपासून लोकल प्रवास करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वच महिलांसाठी लोकलसेवा खुली करण्यापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेला लोकल फेऱ्यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तसंच महिला प्रवाशांच्या संख्येनुसार लोकल फेऱ्यांची संख्या ठरवावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्याबाबत सादर केलेला प्रस्तावावर रेल्वे मंडळांकडून विचारविनियम सुरु आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा असल्याचे काल राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रवासासाठी क्यूआर कोडचीही गरज नसल्याचे सांगण्यात आले होते. तसंच सकाळी 11 ते 3 आणि सांयकाळी 7 ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र रेल्वेने अद्याप राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर न केल्याने महिलांच्या रेल्वे प्रवासाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Mumbai Local Train Update: आनंदाची बातमी! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना मुंबई लोकलमधून करता येणार प्रवास)
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील सार्वजनिक वाहतुक बंद होती. अनलॉकिंगच्या माध्यमातून टप्पाटप्प्याने विविध सेवा-सुविधा सुरु करण्यात येत आहेत. सध्या अनलॉक 5 ला सुरुवात झाली असून त्याअंतर्गत मेट्रो रेल, ग्रंथालयं, सिनेमागृहं यांसह इतर सुविधा नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने रेल्वे प्रशासनासमोर महिला लोकल प्रवासाचा प्रस्ताव ठेवला. परंतु, त्यासाठी योग्य नियोजनाची गरज असल्याचे सांगत रेल्वेने त्यास मंजूरी दिलेली नाही.