
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला (Maharashtra Local Body Election) अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधीची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. प्रदीर्घ काळ त्यावर सुनावणी झालीच नव्हती. आज कुठे या याचिकेवर सुनावणी झाली खरी. परंतू, आजही फारसे काही हाती लागलेच नाही. कोर्टाचा निर्णय तर सोडाच उलट 'तारीख पे तारीख' म्हणत कोर्टाने पुढचीच तारीख दिली. कोर्टाने दिलेल्या तारखेनुसार आता ही सुनावणी येत्या 28 मार्च रोजी होणार आहे. कोर्टाची तारीख वारंवार पुढेच ढकलली जात असल्याने निवडणुका पार पडणार तरी कधी? याबाबत प्रशासकीय यंत्रणांमध्ये उत्सुकता आणि राजकीय पक्षांमध्ये घालमेल वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली ही सुनावणी ऑगस्ट 2022 पासून वारंवार पुढेच ढकलली जात आहे. त्यामुळे निकाल लागणार तरी कधी आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार तरी कसा? याबाबत राजकीय नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. पाठीमागील चार महिन्यांपासून या प्रकरणात तारखांमुळे सुनावणी लांबणीवर पडत आहे. कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या वकीलाने सांगितले की, राज्यातील सुमारे 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी आता आता केवळ आदेश देणेच बाकी आहे. इतर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आम्ही फक्त कोर्टाच्या आदेशाची वाट पाहतो आहोत. जुन्या अथवा नव्या अशा कोणत्याही प्रक्रियेनुसार निवडणुका घेण्याची आयोगाची तयारी आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण, सत्तासंघर्षावर निर्णय कधी? सरन्यायाधीशांनी दिले महत्त्वाचे संकेत; घ्या जाणून)
कोर्टातील याचिकांमध्ये ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका, वॉर्डरचना अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे न्यायालय या सर्व मुद्द्यांवर नेमका काय निकाल देते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला कोर्टात सुनावणीच्या तारखा पुढे पुढेच जात आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात करु इच्छिणारे नवे आणि जुने जाणतेही निर्णय कधी लागतो याबाबत डोळे लावून बसले आहेत. निवडणुक आयोगही सर्व तयारी पूर्ण करुन कोर्टाच्या आदेशाची वाट पाहात बसला आहे.