Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona Virus) नवा व्हेरियंट JN.1 चे 19 रुग्ण आढळून आले आहेत. JN.1 व्हेरियंटची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण पुण्यात (Pune) आढळून आल्यामुळे आता पुणे महानगर पालिका प्रशासना्च्या चिंतेत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शनिवारपर्यंत JN.1 व्हेरियंटचे 10 रुग्ण होते, त्यात आता 19 रुग्णांची भर पडली आहे. ठाणे, पुणे, अकोला, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. JN.1 च्या पहिल्या रुग्णाची नोंद केरळमध्ये झाली होती. एका 79 वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. त्यानंतर तो देशभरात पसरु लागला आहे. (Covid Cases in India: गेल्या 24 तासात देशभरात 841 रुग्णांना कोरोनाची लागण; 'या' राज्यांमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू)

देशात कोरोना विषाणूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 881 नवे रुग्ण आढळले असून, गेल्या 227 दिवसांतील हा उच्चांक आहे. त्याचवेळी, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यासह, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4,309 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत केरळ, कर्नाटक आणि बिहारमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा JN.1 व्हेरियंट घातक नसला तरी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकांना मुखपट्टी लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नव्या वर्षानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.