Grampanchayat Election Result 2022: राज्यातील 271 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल जाहीर
Elections | (File Image)

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांकडे अवघ्या राज्याचे लक्ष्य लागले होते. अखेर या निवडणुकांचा निकाल (Grampanchayat Election Result 2022) आज (5 ऑगस्ट) जाहीर झाला. राज्यभरात झालेल्या जवळपास 238 ग्रामपंचायतींचा निकाल हा संमिश्र स्वरुपाचा लागला आहे. म्हणजेच कोणत्याच पक्षाला अथवा गटाला म्हणावे तसे भरघोस यश अथवा अपयश मिळाले नाही. राज्यभरात जून महिन्यामध्येच एकूण 271 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, त्यापैकी जवळपास 33 ग्रामपंचायती पूर्णत: किंवा अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत 238 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला.

ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसतात. त्या स्थानिक पातळीवरील असतात. त्यामुळे उमेदवारांना निवडणूक आयोग देईल ते चिन्ह घ्यावे लागते. परिणामी कोणत्याच राजकीय पक्षाला अथवा गटाला एखाद्या निवडणुकीत आम्हालाच यश मिळाले आहे असा दावा करता येत नाही. अर्थात स्थानिक पातळीवरही राजकीय पक्षांचे गट-तट आणि आघाड्या असतात. कार्यकर्ते असतात. हे कार्यकर्ते कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने असात त्यानुसार ती ग्रामपंचायत त्या पक्षाची किंवा गटाची मानली जाते. याला कोणताही घटनात्मक आधार असत नाही. केवळ वर्तमान राजकीय स्थिती पाहून अनुमान अथवा निष्कर्ष काढावे लागतात. (हेही वाचा, Grampanchayat Election Result 2022: ग्रामपंचायत निवडणूक निकाल; 15 जिल्ह्यांपैकी 62 तालुक्यांतील 238 गावांमध्ये अनेकांना विश्वास 'गुलाल आपलाच')

अनेकदा ग्रामपंचायत सदस्यांची संख्या 7 ते 14 यादरम्यानच असते. यामध्ये एक जरी सदस्य इकडेतिकडे गेला तरी अनेकदा बहुमत बदलण्याची चिन्हे असतात. त्यामुळे कोणत्याच राजकीय पक्षाला आमूक एखाद्या ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता हा दावा करता येत नाही. जे लोक दावे करतात किंवा तसे अर्थ लावतात ते केवळ स्वत:च्या समजूतीतून आलेले असतात. जोपर्यंत निवडणूक आयोग तसे काही जाहीर करत नाही तोपर्यंत त्याला काहीच आधार नसतो. महत्त्वाचे असे की, सध्या तरी ग्रामपंचायत निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे राजकीय पक्ष अथवा गटांच्या दाव्यांना काहीच अर्थ नसतो.