
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना बँकांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. त्यांनी बँकांना कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरचा (CIBIL Scores) आग्रह धरू नये असे सांगितले आहे. त्यांनी बँकांना सांगितले की, त्यांनी शेतकऱ्यांच्या सिबिलकडे लक्ष न देता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे. सिबिल ही प्रत्यक्षात कर्ज पात्रता मोजण्यासाठी एक प्रणाली आहे, ज्या अंतर्गत कर्जासाठी अर्ज केलेली व्यक्ती ते परतफेड करण्यास पात्र आहे की नाही हे जाणून घेतले जाते. सिबिल स्कोअर हा भारतातील क्रेडिट ब्युरोपैकी एक असलेल्या ट्रान्सयुनियन सिबिलचा क्रेडिट स्कोअर आहे. तो 300 ते 900 पर्यंत असतो.
मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या 167 व्या राज्यस्तरीय बँकर्स समिती बैठकीत उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही, तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका. बँकांना यापूर्वीही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापूर्वी यासंदर्भात निर्देश न जुमानणाऱ्या बँकावर ‘एफआयआर’ देखील दाखल केले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सिबिल स्कोअर मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकरी हा राज्याचा कणा असून कृषी व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. या भागाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवे. (हेही वाचा: Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय)
चांगला पाऊस झाला की, कृषी विकासदर चांगला असतो. याचा लाभ बँकांनीही घ्यावा आणि शेतकऱ्यांनाही द्यावा. कृषी क्षेत्रामध्ये सध्या गुंतवणूक धोरण राबवण्यात येत आहे. त्यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी या गुंतवणूकीमध्ये सहभागी व्हावे. कृषी क्षेत्रामध्ये किमान 5 हजार कोटी प्रतिवर्षी गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आता गुंतवणुकीला नवीन संधी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीतजास्त पतपुरवठा करावा. त्याचा बँकांना फायदाच होणार आहे.