Maharashtra Government Formation: बहुमत चाचणी नंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद?
शरद पवार आणि अजित पवार (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात अखेर सत्ता स्थापन झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकासआघाडी मधील अन्य सहा जणांनी सुद्धा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र आता उपमुख्यमंत्री पद कोणाला देणार यावर सस्पेंस अद्याप कायम आहे. या पदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. गुरुवारी शिवतीर्थावर शपथविधी पार पडण्यापूर्वीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची कमान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते.

राष्ट्रवादी पक्षाच्या एका नेत्याने असे म्हटले आहे की, बहुमत चाचणी नंतर अजित पवार यांना उपमुख्यंत्री म्हणून घोषित केले जाणार आहे. आधीपासूनच अजित पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी सुचवण्यात आले होते. उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेतला जाणार आहे. तसेच शिवतीर्थावर गुरुवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या 2-2 नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांची नावे आहेत.(मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय; सहा मंत्र्यांसह पार पडली पहिली कॅबिनेट बैठक)

तर काही दिवसांपूर्वी राजकीय भुकंप राज्यात पहायला मिळाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने मिळून भाजपला सुप्रीम कोर्टात खेचले. सुप्रीम कोर्टाच्या बहुमत चाचणीच्या आदेशानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.