(photo courtesy: archived, edited, symbolic images)

"आता लंचटाईम सुरु आहे नंतर या" ,कोणत्याही सरकारी कार्यलयात अगदी नेहमी ऐकू येणारं हे वाक्य सामान्य जनतेला आता अर्ध्या तासाहून अधिक वेळ ऐकावे लागणार नाही. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारनेच आता राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नियम बनवला आहे, आता सरकारी कार्यालयात लंचची वेळ ही दुपारी एक ते दोन दरम्यान ठरवण्यात आली असून या वेळेत कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ ब्रेक घेऊ नये असा आदेश देण्यात आला आहे. यासोबतच कार्यलयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी जेवण करायला जाऊ नये असे देखील सूचित करण्यात आले आहे. कार्यालयीन वेळात कर्मचाऱ्यांची अनिश्चित वेळेसाठी अनुपस्थिती आणि त्यामुळे नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन सरकारतर्फे आता हा फतवाच काढण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी 18 सप्टेंबर 2001 च्या शासन परिपत्रकाद्वारे दुपारी एक ते दोन या वेळेत जास्तीत जास्त अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली होती. मात्र राज्यातील इतर शासकीय कर्मचारी याचे पालन करण्यास बांधील नव्हते. यामुळे हे कर्मचारी व अधिकारी आपल्या सोयीनुसार जेवणाच्या वेळा ठरवत असत यामुळे सामान्य नागरिकांचे काम मात्र अनेकदा रखडून राहत असे. यावर तोडगा काढण्यासाठी आता हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.  आनंदाची बातमी: नवे सरकार सत्तेत आल्यावर 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, मिळणार ज्यादा भत्ते

 

नवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी दुपारी एक ते दोन या दरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाहीत,तसेच 30 मिनिटांपेक्षा अधिक अवधी घेणार नाहीत याची संबंधित कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी असे प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.हा नियम राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी समान असणार आहे.