आनंदाची बातमी: नवे सरकार सत्तेत आल्यावर 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, मिळणार ज्यादा भत्ते
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अखेर लोकसभा निवडणुकांच्या निर्णयाला आणि रिझल्टला काही तास शिल्लक आहेत. भारतात आता नवे कोणते सरकार येईल याचा निर्णय उद्या होणार आहे. भारतातील जनतेचे पुढील 5 वर्षांचे भविष्य या उद्याच्या निर्णयावर अवलंबून आहे. भले उद्या कोणतेही सरकार येउदे, काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस आनंदाचा ठरणार आहे. नवीन सरकारची सत्ता आल्यावर लगेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Central Government Employees) पगार आणि भत्त्यांमध्ये 7 व्या वेतन आयोगानुसार वाढ केली जाणार आहे. यासंबंधीची घोषणा आधीच केली गेली होती, मात्र निवडणुकांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या कमीत कमी पगारात वाढ करण्यात यावी, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र निवडणुका आल्या आणि आचारसंहिता लागू झाली. यामुळे हा निर्णय त्वरीत लागू करण्यात आला नाही. अखेर आता नवीन सरकार येणार असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांची चंगळ होणार आहे. यामध्ये कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 26 हजाराची वाढ पगारात करण्यात येणार आहे. (हेही वाचा: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ)

ही वाढ एकाचवेळी केली जाणार नसून, टप्प्या टप्प्याने ती दिली जाणार आहे. या निर्णयाचा फायदा तब्बल 9 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल (BSF), सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (CISF), सेवा निवड बोर्ड (SSBबी), इंडो-तिबेटी बॉर्डर पोलिस (ITBP) भारतीय रेल्वे कर्मचारी, आयटीएस (ITS) आणि बीएसएनएल सरकारी विभागांमध्ये काम करणारे लोक यांचा समावेश आहे.