Raksha Bandhan in Sangli | (Photo Credits: ANI)

Flood in Sangli: सांगली येथील महिलांनी यंदा रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण सणाच्या दिवसापूर्वीच साजरा केला. सांगलीतील अनेक महिलांनी पूरग्रस्तांना मदत आणि बचावकार्यात मोठी कामगिरी केल्याबद्दल एनडीआरएफ जवानांना राखी (Rakhi) बांधली. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांनी व्यक्ती केलेली भावना बहेच काही सांगून जात होती. तुम्ही भावासारखे धाऊन आलात आणि आमचे प्राण वाचवले, खूप खूप आभार, असे म्हणत आपल्या मानातील भावना या महिला आणि तरुणींनी या वेळी व्यक्त केली.

सांगली हे शहर आणि जिल्ह्याचा काही भाग हा गेले काही दिवस जलमय झाला आहे. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेच. पण, नागरी वस्तीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांची घरं, रुग्णालयं, दुकानं आणि सरकारी कार्यालयंही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अचानक उद्भवलेल्या या स्थितीमुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले. त्यामुळे ते नागरिक घरातच अडकून पडले होते. अशा वेळी महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ जवान या नागरिकांच्या मदतीला धाऊन आले. या जवानांनी बोटीच्या मदतीने अनेक महिला, नागरिक, वृद्ध आणि लहान मुलांना पाण्याबाहेर काढत सुरक्षीत ठिकाणी हालवले.

इंडियन आर्मी ट्विट

सांगली, कोल्हापूर शहर जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापूरातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मदत करताना एनडीआरएफ पथकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही हे जवान नागरिकांना सुरक्षीतपणे बाहेर काढत आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या मनात या जवानांविषयी देवदूत अशीच प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे हीच भावना कायम ठेवत सांगिलीतील अनेक महिला आणि तरुणींनी या जवानांना भाऊ समजून राखी बांधली आहे. (हेही वाचा, पूरग्रस्तांना 5 हजार रोख तर उर्वरीत रक्कम खात्यात जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; मंगळवारपासून सुरु होणार प्रक्रिया)

एएनआय ट्विट

दरम्यान, सांगली, कोल्हापूर शहरातील पूराचे पाणी आता ओसरु लागले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमिवर मदत आणि बचाव कार्यास वेग आला आहे. मदतीचा ओघ वाढत असून, राज्य आणि देशातील विविध भागांतून पूरग्रस्तांसाठी अन्न, कपडे, जिवनावश्यक वस्तू अशा बऱ्याच गोष्टी पूरवल्या जात आहेत. यात नागरिक वैयक्तीस रुपात मदत करत आहेत. तर, काही सामाजिक संस्था, संघटना यांचा समावेश आहे.