महाराष्ट्रातील (Maharashtra) लॉकडाऊन (Lockdown) तुर्तास तर नाही, निर्बंध मात्र कठोर होणार, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, अशी चर्चा होती. राज्य सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्र राजेश टोपे (Rajesh Tope) आणि काही अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात लॉडाऊन लावण्याबाबत तुर्तास तरी लागू करु नये. मात्र, निर्बंध अधिकच कठोर करायला हवेत, असा सूर उमटला. त्यामुळे राज्यात अद्याप तरी लॉकडाऊनची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील एकूण कोरोना स्थिती पाहता सध्यातरी लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. त्याउलट टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याबाबत सूचवले आहे. म्हणजेच रुग्णांची संख्या वाढत जात असली तरी, राज्य 100% बंद करण्याची आता आवश्यकता नाही. मात्र, अनावश्यक गोष्टींवर निर्बंध घालता येतील का याबाबत कठोर विचार करायला हवा. त्यामुळे गर्दीचे कारण ठरणाऱ्या कार्यक्रम, आणि गोष्टींवर निर्बंध टाकण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, आज त्वरीत त्यावर काही निर्णय घेतला जाईल आणि निर्बंध लागू केले जातील असे नाही. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय जाहीर करतील, असेही राजेश टोपे म्हणाले. (हेही वाचा, COVID 19 in Maharashtra: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोविड 19 परिस्थिती चा आढावा घेणारी बैठक संपन्न; अद्याप कडक लॉकडाऊन वर निर्णय नाही)
प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या अधारे दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राज्यात निर्बंध अधिक कठोर केल्यास सुरुवात फॅन्सी मास्कपासून होण्याची शक्यता आहे. ज्या नागरिकांना सौम्य लक्षणे दिसत आहेत त्यांना गृह विलगीकरणात ठेवले जाऊ शकते. गंभीर लक्षणे असणाऱ्यांना थेट रुग्णालयात दाखल करुन कॉन्टॅक्ट ट्रेस पासिंगही वेगाने केले जावेत, अशी काळजी घेतली जाईल.
दरम्यान, राज्यात विकेंड लॉकडाउन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद याशिवा शनिवार आणि रविवारी पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे आणि चौपाट्या पूर्णपणे बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे. रात्रीची संचारबंधी अधिक कडक करण्यातत येऊ शकते. जेणेकरुन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला चाप बसू शकेल.