Maha Vikas Aghadi | (Photo Credits: ANI)

Maharashtra CM Oath-Taking Ceremony: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज संध्याकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची (Maharashtra Chief Minister) शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. मात्र, अहवालानुसार महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghad) iनेते या सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह विरोधी छावणीतील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असले तरी, विरोधी नेते या सोहळ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची शक्यता आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. फडणवीस यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

फडणवीस यांनी स्वतः शरद पवारांना फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. मात्र, संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पवार नवी दिल्लीत असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता नाही.

प्रोटोकॉलनुसार माजी मुख्यमंत्र्यांना समारंभासाठी आमंत्रित केले जाते. त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. पण तरीही ते या समारंभापासून दूर राहतील. ठाकरे यांनी जाहीरपणे याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. दुसरीकडे, फडणवीस यांनी स्वतः राज ठाकरे यांनाही फोनवर निमंत्रण दिल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मात्र, राज ठाकरे वैयक्तिक कारणास्तव शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. (हेही वाचा: Uday Samant On Eknath Shinde: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही; उदय सामंत यांची भूमिका)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ न घेतल्यास पक्षाचा कोणताही आमदार नव्या महाराष्ट्र सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही, असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले. शपथविधी सोहळ्याच्या काही तास अगोदर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराचा उपमुख्यमंत्री होण्याचा विचार नाही आणि हे पद फक्त शिंदे यांच्याकडेच असावे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीच्या हातून दारुण पराभव पत्करावा लागला. 288 पैकी महायुतीने 235 जागा जिंकल्या आणि दणदणीत विजय मिळवला. 132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.