विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती कायम राहणार, जागांबद्दल वाद नको: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (Photo Credit : Facebook, Devendra Fadnavis)

महाराष्ट्रात येत्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) पार्श्वभूमीवर आज, मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुंबईत भाजपाची पक्षविस्तार कार्यकारणी बैठक घेतली होती. ज्यात त्यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती (BJP- Shivsena Alliance)  कायम ठेवणार असल्याची घोषणा केली, तसेच कोणीही युतीबाबत संभ्रम ठेवू नये तसेच जागांबद्दल विनाकारण वाद घालू नयेत अशी सूचना सुद्धा या सभेत केली. मागील काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीत युतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री नेमका कोणत्या पक्षाचा होणार याविषयी तर्क वितर्क लावले जात होते, यावर फडणवीस यांनी "जर का मी मुख्यमंत्री झालो तर काही एकट्या भाजपचा नव्हे तर शिवसेनेचा सुद्धा मुख्यमंत्री असेन" अशा युक्तिवादाने उत्तरं दिले. तसेच या प्रश्नावरून वाद घालणाऱ्या मित्रपक्षांच्या मंडळींमध्येच जास्त खुमखुमी आहे असे म्हणत त्यांनी शिवसेनेनेला टोला लगावला.

सध्या देशभरात अनेक पक्षात सदस्य नोंदणी सुरु आहे, या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी सामान्य नागरिकांना भाजप पक्ष सदस्य होण्यासाठी सुद्धा आव्हान केले आहे. याशिवाय , येत्या 1 ऑगस्ट पासून पुढील पूर्ण महिनाभर महाराष्ट्रात भाजपाची महाजनादेश यात्रा काढण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या या यात्रेत मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देतील. तसेच सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. ही यात्रा काही खाजगी नसून यामध्ये कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होतील अशी अपेक्ष फडणवीस यांनी बैठकीत व्यक्त केली.

दरम्यान, आजच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधानसभा सभापती हरभाऊ बागडे यांच्यासह भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.