Maharashtra Cabinet Expansion: निष्ठावंतांनो फक्त पक्षकार्य करा, आयारामांच्या गळ्यात मंत्रिपदाच्या माळा; एकनाथ शिंदे सरकारचा थाटच न्यारा
Maharashtra Cabinet Expansion | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज पार पडला. एकनाथ शिंदे गट आणि भाजप (BJP) अशा दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अनेक इच्छुकांना डावलून दोन्ही बाजूंनी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. विशेष असे की, मंत्रिपदावर वर्णी लागलेले अनेक चेहऱ्यांमध्ये निष्ठावान कमी आणि आयारामच अधिक दिसत होते. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार नाराजी पसरली आहे. निष्ठावंतनांनी केवळ पक्षकार्यच करावे, आयारामांनी निष्ठावंतांच्या नावावर टीच्चून मंत्रिपद मिळवावे अशीच एकूण ही स्थिती. या विचित्र राजकीय पक्षनिष्ठेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. घ्या जाणून कोणत्या मंत्र्याने किती वेळा बदलला पक्ष.

भाजप काय किंवा एकनाथ शिंदे गट काय सर्वांनाच मंत्रिपदे देता येणार नाहीत हे तर उघडच होते. त्यामुळे हे वास्तव सर्वांनाच स्वीकारावे लागणार होते. मात्र, नेमकी कोणाकोणाला मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते आणि कोणाचा पत्ता आयत्या वेळी कापला गेला याबाबत सर्वांचा उत्सुकता होती. याच मुद्द्यावरुन शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीतही जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. खास करुन संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दादा भुसे, अब्दुल सत्तार ते राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांचाही समावेश)

मंत्रिमंडळ यादी (पक्षनिहाय)

एकनाथ शिंदे गट

तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील

भाजप

गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा

मंत्रिमंडळातील आयाराम अर्थातच दलबदलूंची यादी

राधाकृष्ण विखे पाटील: राधाकृष्ण विखे पाटील यांची पक्षांतर करण्याची ख्याती मोठी आहे. त्यांनी काँग्रेस-शिवसेना आणि पुढे परत काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास केला आहे.

दीपक केसरकर: दीपक केसरकर यांची पक्षनिष्ठा ही मोठी फिरती राहिली आहे. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून केली. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथेही ते फार रमले नाहीत. त्यांनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उडी मारत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल आहेत.

उदय सामंत: उदय सामंत हे सुद्धा दीपक केसरकर यांच्यासारखेच वेगळे प्रकरण. उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरु केली. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेत मंत्रिपद मिळूनही त्यांनी एकनाथ शिंदे गटात उडी मारली.

अब्दुल सत्तार: अब्दुल सत्तार तर पक्षांतर करण्यात एकदम पटाईत. त्यांनी काँग्रेसमध्ये अनेकदा आमदारकी मिळवली. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता ते शिंदे गटात गेले आहेत.

तानाजी सावंत: तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीतून राजकीय पकड मिळवली. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता मात्र ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.

विजयकुमार गावित: विजयकुमार गावीतही त्याच प्रकारात मोडणारे. नंदुरबार मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2000 ते 2014 असे सलग प्रदीर्घ काळ ते निवडूण आले आहेत. आता त्यांनी भाजपमधून मंत्रिपदाची शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतलेल्या प्रत्येक नेत्यावर काही ना काही आरोप झालेले आहेत. तसेच, वरील सर्व मंडळी ही सातत्याने पक्ष बदलत असल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.